देशभक्ती आणि प्रेम यांच्या अद्वितीय संगमातून साकार झालेलं “मेरी दुनिया तू” हे गाणं आज पॅनोरमा म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालं असून, संगीतप्रेमींमध्ये आणि विविध कलाक्षेत्रात याचे भरभरून स्वागत होत आहे. एका नवविवाहित भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित असलेलं हे गाणं, त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर, देशसेवेच्या कठोर वास्तवाचं भेदक चित्रण करतं.
या गाण्याचं गीत आणि संगीत श्रेयस देशपांडे यांनी केलं आहे. केवळ दिग्दर्शक म्हणूनच नव्हे तर एक प्रतिभावान गीतकार-संगीतकार म्हणूनही श्रेयस देशपांडे यांनी आपल्या कलाकृतीतून मन जिंकून घेतलं आहे. सह-दिग्दर्शक श्रेयस भागवत यांनी संकल्पना अधिक प्रभावी बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, तर सहाय्यक दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर उमेश कोरडे यांच्या भव्य आणि भावस्पर्शी चित्रणाने गाण्याला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे.
“मेरी दुनिया तू” हे गाणं गायलं आहे तन्मय संचेती आणि ईश्वरी ठाकूर. या दोघांच्या भावनांनी ओथंबलेल्या गायनामुळे गाण्याला एक अस्सल, अंतःकरणाला भिडणारं रूप प्राप्त झालं आहे. त्यांचा सूर, बोल आणि संगीत यांचा समन्वय श्रोत्यांच्या मनाला भारावून टाकत
गाण्यात प्रमुख भूमिकेत चेझन लॉयर आणि गायत्री जैन यांनी अभिनय केला असून, त्यांनी नवविवाहित जोडप्याच्या नाजूक नात्याचं आणि अचानकच आलेल्या वेगळेपणाच्या वेदनेचं अत्यंत संवेदनशीलतेने दर्शन घडवलं आहे. सैन्य अधिकारी आणि त्याच्या पत्नीमधील नातं, त्यांच्या प्रेमातली गोडी आणि त्याचबरोबर देशासाठी दोघांनी केलेल्या त्यागाचं भावनिक चित्रण या गाण्यातून समोर येतं. तसेच या गाण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे ओम कडू, वैभव टकले, दिग्विजय मते, अश्विनी मोहोळ, करिष्मा फडतरे, सिद्धार्थ चव्हाण, यश भोर, विनोद राजे, गौरवराज आणि आनंद मुरुगकर यांनी.
या गाण्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे, हे केवळ सैनिकाच्या त्यागाबद्दलच बोलत नाही, तर एका स्त्रीच्या – एका पत्नीच्या त्यागाचंही सुंदर, हृदयस्पर्शी प्रतिबिंब यात उमटतं. फक्त रणभूमीवर नव्हे, तर घरामध्येही देशासाठी जे काही सोसलं जातं, ते या गाण्यातून स्पष्टपणे जाणवतं.
गाण्याच्या प्रदर्शना नंतर, समाज माध्यमांवर आणि संगीत व चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांकडून या गाण्याचं कौतुक होत आहे. विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी या गाण्याच्या भावनात्मक मांडणीला, संगीताला, आणि अभिनयाला विशेष दाद दिली आहे.
“मेरी दुनिया तू” हे गाणं आजच्या तरुण पिढीला प्रेम आणि देशभक्ती यांच्यातील समतोल दाखवतं, आणि एक विचारप्रवृत्त करणारा संदेश देते – की प्रेम ही केवळ साथ नसते, तर त्याग करण्याची तयारीही असते.
हे गाणं आता पॅनोरमा म्युझिकच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर आणि इतर संगीत प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.