शबनम न्यूज | पुणे
ओला कचरा, किचन वेस्ट आणि टाकाऊ भाजीपाला यातून पर्यावरणपूरक असे सुंदर व हिरवेगार टेरेस गार्डन कात्रज परिसरात फुलले आहे. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर साई जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून ८०० चौरस फूट जागेत फळे, फुले, भाज्या आणि शोभेच्या झाडांनी ही बाग फुलवण्यात आली आहे. या टेरेस गार्डनमध्ये शेवगा, कारले, संत्रा, पपई, कांचन, बहावा, चाफा, जास्वंद, सदाफुली, कर्दळी, तगर, गुलाब, बांबू, ऊस, शोभेची रोपे अशी फळझाडे, फुलझाडे आहेत. फळा-फुलांचा बहर आला असल्याने ही बाग अतिशय सुंदर दिसत आहे.
साई जनसेवा प्रतिष्ठान व कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त उपक्रमातून साकारलेल्या या बागेचे उद्घाटन बुधवारी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते झाले. प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपयुक्त जयंत भोसेकर, क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने, साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सुरज लोखंडे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहोरकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, “टायर, ड्रम, विटा यांसारख्या टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून बनवलेली ही बाग खूपच सुंदर झाली आहे. फळे, फुले आणि भाजीपाला तयार होतानाच, स्वच्छ प्राणवायू निर्माण होत आहे. घरातला ओला कचरा या बागेत जिरवला जात आहे. त्यामुळे कचरा कमी होणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी याचे अनुकरण करावे. आपल्या परसबागेत, गच्चीवर अशी छोटी बाग फुलवावी आणि त्यात टाकाऊ वस्तू आणि ओला कचरा जिरवावा. फक्त सुका कचरा पालिकेकडे प्रक्रिया करण्यासाठी द्यावा. प्रत्येकाने यामध्ये पुढाकार घेतला आणि ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर कचऱ्याचे विकेंद्रीकरण होऊन शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल. शिवाय अशा भागांमधून आरोग्यदायी, भाजीपाला फळे उपलब्ध होतील. जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील. असा पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्यासाठी पुणे महानगरपालिका नेहमीच प्रोत्साहन देईल एवढ्या सुंदर उपक्रमासाठी साई जनसेवा प्रतिष्ठान व आमच्या क्षेत्रीय कार्यालयाचे अभिनंदन करतो.”
गीता मोहोरकर म्हणाल्या, “महानगरपालिकेच्या सहकार्याने शहरातील सिंहगड रस्ता, धनकवडी-सहकारनगर आणि कोंढवा-येवलेवाडी येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर ओल्या कचऱ्यापासून बाग तयार करण्यात आली आहे. केवळ ओला कचरा जिरवून त्यात झाडे लावण्यात आली आहेत. दोनशे लिटरच्या १६० ड्रममध्ये ही झाडे लावण्यात आली असून, यामध्ये रोज ६०० ते ७०० किलो ओला कचरा जिरवला जात आहे. टाकाऊ ड्रमचा वापर करून त्यापासून बसण्यासाठी खुर्च्याही तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे कमी जागेत, कमी वेळेत आणि कमी खर्चात ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन शक्य झाले आहे. नागरिकांनी आपल्या घरी, सोसायटीमध्ये अशा बागा फुलवल्या, शहरातील कचऱ्याची वाढती समस्या आटोक्यात येण्यास निश्चित मदत होईल.”
सुरज लोखंडे यांनी सांगितले की, साई जनसेवा प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षापासून शहराच्या विविध भागात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण संवर्धन, तसेच महिला व युवक-युवतींकरिता विविध उपक्रम राबविले जातात. मुखत्वे कचरा व्यवस्थापन विषयक उपक्रमही राबविले जातात.