- पनवेल, कर्जत, उरण, लोणावळा विभागातील कामांचा आढावा
शबनम न्यूज | पिंपरी
घाट भागात रेल्वेचे इंजिन घासते, वेळही जातो. त्यामुळे कर्जत ते लोणावळा दरम्यान टनेल निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठीचा 2100 कोटी रुपयांचा विकास आराखडा (डीपीआर) तयार आहे. हा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. हा टनेल करण्यासाठी आवश्यक ती मदत मदत करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली असल्याचेही बारणे यांनी सांगितले.
मुंबई विभागाची रेल्वे विभागाची बैठक बुधवारी पार पडली. मुंबई विभागाअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, कर्जत, उरण, नेरळ ही रेल्वे स्थानके येतात. बैठकीची माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, कर्जत रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचा डीपीआर तयार आहे. ओव्हर ब्रीजच्या कामाला गती द्यावी. खोपोलीत पर्यटन मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे त्या स्थानकाचा विकास करावा. पनवेल रेल्वे स्थानक मॉडेल स्थानक बनविण्यात येणार आहे. दिवा ते उरण लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवावा. 21 भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्याला गती द्यावी. काही रेल्वे स्थानके सिडकोने उभारली आहेत. त्याची देखभाल दुरुस्ती त्यांच्या माध्यमातूनच केली जात आहे. ती स्थानके रेल्वे विभागाने ताब्यात घ्यावीत. कर्जत, नेरळ, लोणावळा रेल्वे स्थानकावर सरकते जिने, लिफ्ट अशा सुविधा निर्माण कराव्यात.
प्रवाशांसाठी पाणी, स्वच्छतागृह अशा सुविधा देण्यात याव्यात. कोरोना कालावधीत लोणावळा, कर्जत रेल्वे स्थानकावरील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याचे थांबे बंद करण्यात आले होते. या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे द्यावेत, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली. माथेरानला पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे माथेरान अमनलोज माथेरान ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या जाव्यात. अमृत भारत रेल्वे अंतर्गत सुरू असलेल्या रेल्वे स्थानकाच्या विकासाचा आढावा घेतला. त्या कामाला गती देण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली आहे.
त्यावर रेल्वे संदर्भातील रखडलेली सर्व कामे वर्षेभरात मार्गी लागतील. निधीची कमतरता भासणार नाही. अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी महाराष्ट्राला मिळाला असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.