शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील उद्यानांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. उद्यानांमधील तुटलेली खेळणी, अस्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण अभाव यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अनेक महिन्यांपासून उद्यानांची देखभाल करण्यात आलेली नाही. मुलांसाठी बसवलेली खेळणी तुटलेल्या अवस्थेत असून ती धोकादायक ठरत आहेत. याशिवाय, सुरक्षा रक्षक नसल्याने उद्यानांमध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा वावर वाढल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही उद्यान विभाग आणि सुरक्षा विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता “ठेकेदार उपलब्ध नाही” किंवा “निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही” अशी कारणे देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रतिनिधी डब्बू आसवानी यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “प्रशासन जर अशीच कारणे देत राहणार असेल, तर आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे? जर महानगरपालिकेला उद्यानांची देखभाल आणि सुरक्षा देणे शक्य नसेल, तर ही उद्याने बंद करावीत,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच त्यांनी महानगरपालिकेच्या प्राधान्यक्रमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महानगरपालिका उड्डाणपुलांवरील विद्युत रोषणाईसाठी २२ कोटी रुपये खर्च करू शकते, पण लहान मुलांच्या उद्यानातील खेळण्यांच्या दुरुस्तीसाठी निधी नसणे ही अत्यंत शरमदायक बाब आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, नागरिकांनीही आयुक्तांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून उद्यानांची दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.




