spot_img
spot_img
spot_img

संभाजी महाराज पुतळा प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; १४ कोटींच्या अपव्ययाचा आरोप

निविदा प्रक्रियेत अनियमितता? संभाजी महाराज पुतळा प्रकल्पावर विरोधकांचा हल्लाबोल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळा प्रकल्पाच्या टप्पा १ व २ मधील निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर व शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून त्यांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या स्मारकात पारदर्शकता आणि नियोजन असणे आवश्यक आहे. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत प्रशासकीय अनास्था, चुकीचे नियोजन आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या मूळ निविदेनुसार निश्चित करण्यात आलेल्या जागेवर सुमारे १४ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र प्रकल्प सल्लागाराने जागेची योग्य पडताळणी न केल्याने नंतर ही जागा बदलावी लागली. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशांचा मोठा अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच पुतळा उभारणीसारख्या विशेष कामासाठी अनुभवी एजन्सीची निवड होणे अपेक्षित असताना मे. धनेश्वर या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीला पुतळा उभारणीचा कोणताही अनुभव नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात पुतळा तयार करण्याचे काम जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केले असून, त्यांना देयके मुख्य कंत्राटदारामार्फत देण्यात आली. ही प्रक्रिया निविदा नियमांना धरून नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याशिवाय प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील मूळ १५ कोटी ११ लाख रुपयांच्या निविदेमध्ये सुमारे ५ कोटी ४१ लाख रुपयांची वाढ करण्यात आली असून ही वाढ सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे निवेदनात नमूद आहे. स्पर्धात्मक निविदेनंतर इतकी मोठी वाढ करणे नियमबाह्य असून अशा परिस्थितीत फेरनिविदा काढणे अपेक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे.

टप्पा २ मधील कामांमध्ये विद्युत आणि स्थापत्य कामे एकत्रितपणे समाविष्ट करण्यात आल्याने विद्युत क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्यांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली नाही, असा आरोपही नगरसेवकांनी केला आहे.

या सर्व बाबींची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व संबंधित एजन्सींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच सार्वजनिक निधीचा अपव्यय झालेल्या रकमांची वसुली करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे.

महापालिका आयुक्तांना निवेदन देताना विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायी समिती सदस्या सुलभाताई उबाळे, तसेच नगरसेवक संदीप वाघेरे, शेखर चिंचवडे, पंकज भालेकर, संतोष कोकणे, संगिता ताम्हाणे, उज्वला ढोरे, सागर कोकणे, सविता आसवानी, निकिता कदम, रेश्मा कातळे, विराज लांडे, दिप्ती कांबळे, वर्षा जगताप, प्रियांका कुदळे, यश साने आदी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!