शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘भगवान बुद्ध आणि महावीरांची शिकवणच आजच्या जागतिक परिस्थितीवरील तोडगा आहे!’ असे विचार ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सायन्स पार्क सभागृह, चिंचवड येथे शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी व्यक्त केले. कर्मयोगिनी महिला संस्था आयोजित आणि कवयित्री सीमा शिरीष गांधी लिखित ‘मी झाड व्हावे’ या काव्यसंग्रहाचे तसेच स्वर्गीय पुष्पाबाई शांतीलाल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आयोजित ‘पत्र पुष्पांजली’ या पत्रलेखन स्पर्धेतील पत्रसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. याप्रसंगी ॲड. प्रार्थना सदावर्ते, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, नीलिमा फाटक, अरुण बोऱ्हाडे आणि दिनेश भोंबड यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती लाभली होती; तसेच पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातील अनेक दिग्गज साहित्यिक,
साहित्यप्रेमी, कवी, वाचक आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित होते.
प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘आजच्या जागतिक परिस्थितीत संघर्ष, असहिष्णुता आणि मूल्यांचा ऱ्हास वाढताना दिसतो. अशा काळात भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांच्या शांतता, करुणा आणि अहिंसेची शिकवणच मानवजातीला योग्य दिशा देऊ शकतात. समाजात समता, सहअस्तित्व आणि संवेदनशीलता वाढवण्यासाठी त्यांच्या विचारांची आज अत्यंत गरज आहे. कवयित्री सीमा शिरीष गांधी यांनी ‘मी झाड व्हावे’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून झाडाचे सतत देत राहण्याचे तत्त्वज्ञान अधोरेखित केले आहे. झाड सावली देते, फळे देते आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता जग समृद्ध करते. अशा झाडासारखे होण्याची प्रामाणिक इच्छा त्यांच्या कवितांमधून व्यक्त होते. त्यामुळे हा काव्यसंग्रह म्हणजे
समृद्ध जाणिवांचा चांदणप्रवास अभिव्यक्त करणारी सुंदर कलाकृती आहे. या कवितांवर ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर आणि बालकवी यांच्या काव्यपरंपरेचा प्रभाव जाणवतो. मुक्तछंदात लिहिलेल्या या कविता वाचकांशी थेट संवाद साधतात. साधी, सहज आणि हृदयस्पर्शी भाषा ही या कवितांची ताकद आहे; तर अर्थपूर्णता हा त्यांचा आत्मा आहे! ॲड. प्रार्थना सदावर्ते यांनी ‘पत्र पुष्पांजली’ या संग्रहाची सूक्ष्म समीक्षा केली; तर नीलिमा फाटक यांनी कवयित्री सीमा गांधी यांच्या ‘मी झाड व्हावे’ या कवितासंग्रहाचे भावसौंदर्य रसिकांसमोर उलगडले. अरुण बोऱ्हाडे यांनी सीमा गांधी यांच्या काव्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या; तर प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी कर्मयोगिनी महिला संस्थेच्या मराठी संवर्धन आणि पर्यावरण विषयक कार्याबद्दल प्रशंसक उद्गार काढले.
कुणा पांथस्थाला बुद्ध करण्या वृक्ष ज्ञानी अजान व्हावे, मी झाड व्हावे, मी झाड व्हावे
अशा समृद्ध जाणिवांनी नटलेला हा काव्यसंग्रह
कवयित्री सीमा गांधी यांनी स्नेहल आणि सलोनी या आपल्या दोन्ही सुनांना अर्पण केला.
भारतीय टपाल पत्र विभागातील जनसंपर्क अधिकारी दिनेश बोंबड यांनी लोप पावलेल्या पत्रलेखनाच्या संस्कृतीला उजाळा दिल्याबद्दल टपाल विभागातर्फे संस्थेचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात ‘पत्र पुष्पांजली’ पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. त्यात प्रथम क्रमांक (विभागून) : राजश्री बिनायकिया, विभावरी कुलकर्णी
द्वितीय क्रमांक (विभागून) : ॲड. रामचंद्र पाचुणकर, रेणुका कळंबे
तृतीय क्रमांक (विभागून) : डॉ. पौर्णिमा कोल्हे, नेहा शेटे
उत्तेजनार्थ : जयंत कोपर्डेकर, राधिका बडगुजर, अपर्णा जाधव या सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि ‘पत्र पुष्पांजली’ हा विशेष अंक देऊन सन्मानित करण्यात आले. स्नेहल गांधी यांनी गणेश वंदना सादर केली. सीमा गांधी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या संयोजनात राज गांधी, नील गांधी, सलोनी गांधी, शिरीष गांधी आणि शांतीलाल गांधी यांनी परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल गांधी यांनी आभार मानले.



