सहा तासांत व्यापाऱ्याची सुटका; पाच अपहरणकर्ते जेरबंद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
रहाटणी परिसरात स्वतःला ‘उत्तर प्रदेश पोलीस’ असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत अवघ्या सहा तासांत व्यापाऱ्याची सुरक्षित सुटका केली आणि पाच अपहरणकर्त्यांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पोलीस असल्याचे सांगत व्यापाऱ्याला फसवून ताब्यात घेतले व त्यानंतर कुटुंबीयांकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेने तांत्रिक तपास सुरू करत आरोपींचा सुमारे १०० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. अखेर संगमनेर येथील टोल नाका परिसरात आरोपींना वेढा घालून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखविलेली सजगता, तत्परता आणि कर्तव्यदक्षतेबद्दल पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा संबंधित व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांसह शहरातील व्यापारी वर्गाच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
या सत्कारप्रसंगी नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू शेठ आसवाणी, सुरेश जेसवाणी, विजय रामनानी, डॉ. कृष्णन वीरवाणी, सुनील केसवाणी, राजकुमार, घनश्याम ललवाणी, महेंद्र पाणीवाणी, झामन दास, श्रीचंद मंधान, सनी गोविया आदी व्यापारी उपस्थित होते.



