शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १६ (किवळे–मामुर्डी–रावेत परिसर) येथे नव्याने विकसित होत असलेल्या बांधकाम प्रकल्पांना पाणी कनेक्शन देऊ नयेत, अशी ठाम मागणी नगरसेविका रेश्मा बापू कातळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नगरसेविका कातळे यांनी नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक १६ मध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी बांधकाम प्रकल्पांना महापालिकेकडून परवाना तसेच विनापरवाना पाणी कनेक्शन दिली जात आहेत. त्यामुळे या परिसरातील सामान्य नागरिक व सोसायटीधारकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक सोसायट्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसून, नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
पिंपरी चिंचवड शहरालाच सध्या नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसताना, नव्या बांधकाम प्रकल्पांना दिल्या जाणाऱ्या पाणी कनेक्शनमुळे पाण्याचा तुटवडा अधिक गंभीर होत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे आधीच अस्तित्वात असलेल्या रहिवाशांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर, पाण्याची उपलब्धता व विद्यमान नागरिकांच्या गरजा लक्षात घेता, प्रभाग क्रमांक १६ मधील नव्याने विकसित होत असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांना पाणी कनेक्शन देण्यास तात्काळ स्थगिती द्यावी, अशी ठाम मागणी नगरसेविका रेश्मा कातळे यांनी निवेदनातून केली आहे.
तसेच, या विषयाकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन सुधारावे आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.


