शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवी सांगवी येथील कै. य. धो. टण्णू प्राथमिक शाळेत समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जपणाऱ्या सावित्रीबाई दत्तक पालक योजनेअंतर्गत दरवर्षी अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा ‘खारीचा वाटा’ उचलला आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे शाळेची फी भरता न येणाऱ्या गरजू विद्यार्थिनींची फी भरून त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी मोलाची मदत होत आहे. या योजनेमुळे अनेक पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले.
याप्रसंगी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांनी सांगितले की, “आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही ही मदत करीत आहोत. गेल्या बारा वर्षांपासून या शाळेने मला या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिली, याबद्दल मी शाळेचा मनःपूर्वक आभारी आहे. पुढेही अशा चांगल्या कार्यासाठी आम्हाला संधी मिळावी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका लता सावळे यांनी मान्यवरांचे आभार मानताना सांगितले की, “दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोलाची साथ मिळत असून, या उदात्त हेतूने केलेल्या सहकार्यामुळे अनेक विद्यार्थिनींचे भविष्य उज्ज्वल होण्यास हातभार लागतो,” असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमास ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, लक्ष्मण पोळ, योगिता रावडे, सौरभ निकाळजे, शाळेच्या मुख्याध्यापिका लता सावळे, स्मिता मॅडम, विनोद कदम, रत्नाकर राऊत, दिपाली बोरकर, स्नेहा मॅडम, शुभांगी ओव्हाळ, राजश्री पतंगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दरेकर सर यांनी केले तर उषा पोळ यांनी आभार प्रदर्शन केले.


