spot_img
spot_img
spot_img

संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी सह देश-विदेशात ५०० ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन

शबनम न्यूज | पिंपरी
संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ ते सायं. ५ या वेळात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्त संकलन करण्यासाठी विविध रुग्णालयाच्या प्रशिक्षित डॉक्टर व वैद्यकीय तज्ञांच्या टीम सहभागी होतील ज्यामध्ये वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी,ससून रुग्णालय रक्तपेढी, तसेच संत निरंकारी रक्तपेढी विलेपार्ले ची टीम देखील अंतर्भूत असेल. मानव एकता दिवसाच्या निमित्ताने याच ठिकाणी सायंकाळी ६.०० ते ९.०० यावेळेत विशाल सत्संग समारोहाचे ही आयोजन करण्यात आले आहे.
            निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी २४ एप्रिल, २०२५ रोजी दिल्लीतील ग्राउंड नं.८, निरंकारी चौक, बुराडी रोड येथे ‘मानव एकता दिवस’ समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त देशभरातील मिशनच्या समस्त शाखांमधील भाविक भक्तगणदेखील एकत्रित येऊन बाबा गुरबचनसिंहजी आणि मिशनचे अनन्य भक्त चाचा प्रतापसिंहजी यांना आपली श्रद्धा सुमने अर्पित करतील व त्यांच्या महान जीवनातून प्रेरणा प्राप्त करतील.
            संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण विभागाचे प्रभारी आदरणीय श्री जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की सदगुरुंच्या असीम कृपेने यावर्षी देखील जगभरातील सुमारे ५०० पेक्षा अधिक ठिकाणी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या विद्यमाने रक्तदान शिबिरांच्या अविरत श्रृंखलेचे व्यापक आयोजन काण्यात आले आहे. 
            युगदृष्टा बाबा हरदेव सिंह जी यांनी सन् १९८६ पासून सुरु केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये आतापर्यंत ८६४४ शिबिरांमध्ये मिशनमार्फत १४,०५,१७७ युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले आहे आणि या सेवा निरंतर चालू आहेत.
            संत निरंकारी मिशनचे स्वयंसेवक भोसरी आणि दिघी परिसरात घराघरामध्ये जाऊन तसेच दत्तनगर, भारतमाता नगर , मॅगझीन चौक, भोसरी चौक, धावडे वस्ती, आळंदी रोड, दिघी रोड अशा अनेक गर्दीच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे आपण सर्वानी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी मिशनद्वारे करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!