शबनम न्यूज | प्रतिनिधी
रेल्वे अर्थसंकल्पामध्ये पुणे जिल्ह्यातील लाखो उपनगरीय प्रवाशांच्या ज्वलंत समस्यांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असून, याचा चिंचवड प्रवासी संघाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे.
पुणे–लोणावळा उपनगरीय रेल्वे सेवेच्या प्रारंभाला यंदा ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या मार्गावर १७ रेल्वे स्थानके असून दररोज ४२ लोकल गाड्यांद्वारे सुमारे सव्वा लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. ६४ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर लोकल सेवेसाठी स्वतंत्र तिसरी व चौथी रेल्वे मार्गिका झाल्याशिवाय लोकल वाढ शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र सध्या १५० हून अधिक लांब पल्ल्याच्या प्रवासी व मालगाड्यांचा ताण या दुहेरी मार्गावर आहे.
ही बाब लक्षात घेऊन चिंचवड प्रवासी संघ १९९० पासून पुणे–लोणावळा रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाची सातत्याने मागणी करत आहे. गेल्या अनेक वर्षांत रेल्वेमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच रेल्वे अधिकाऱ्यांना लेखी निवेदने, प्रत्यक्ष भेटी व आंदोलने करूनही अद्याप ठोस निर्णय झाला नाही.
मात्र ११ सप्टेंबर २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे–लोणावळा तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे ५१०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून २०२५ ते २०२९ या कालावधीत टप्प्याटप्प्याने काम होणार आहे. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, पीएमआरडीए, पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहभाग आहे. या निर्णयासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल चिंचवड प्रवासी संघाने यापूर्वी आभार व्यक्त केले होते.
पुणे जिल्हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असून कामगार, कष्टकरी, महिला व विद्यार्थ्यांसाठी परवडणारी लोकल सेवा वाढवणे ही काळाची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात पुणे–लोणावळा मार्गावर दुपारी ११ ते ३ या वेळेत लोकल सेवा पूर्णपणे बंद असते, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
तसेच १९९६ साली माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी जाहीर केलेला चिंचवड–रोहा नवीन रेल्वे मार्ग व पुणे–तळेगाव–चाकण मार्गे नाशिकपर्यंत नवीन रेल्वे मार्ग अद्याप कागदावरच आहे. चाकण व नाशिक औद्योगिक क्षेत्रात ये-जा करणाऱ्या मोठ्या वर्गाला याचा लाभ होऊ शकतो.
कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या मुंबई–कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, पुणे–कल्याण मार्गे नाशिक–भुसावळ एक्सप्रेस, बारामती–कर्जत पॅसेंजर शटल, मुंबई–पुणे–सोलापूर एक्सप्रेस या गाड्या त्वरित सुरू करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
आकुर्डी–देहूरोड दरम्यान साडेपाच किलोमीटर अंतर असून आकुर्डीच्या पुढे अवघ्या दोन किलोमीटरवर रावेत येथे नवीन रेल्वे स्थानक निर्माण करावे. रावेत परिसरात दीड लाखांहून अधिक लोकसंख्या असून नवीन स्थानक झाल्यास पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई तसेच परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
तसेच चिंचवड रेल्वे स्थानकावर कोकण, हैदराबाद, सोलापूर, बेंगळुरू, चेन्नई मार्गावरील महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील प्रचंड ताण कमी होईल व प्रवाशांचा वेळ, पैसा व श्रम वाचतील.
रेल्वे प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शहरवासीयांच्या सह्यांसह मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा चिंचवड प्रवासी संघाने दिला आहे.
ही माहिती चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार यांच्यासह नारायण भोसले, मीना अग्रवाल, मुकेश चुडासमा, निर्मला माने, संभाजी बारणे, रजिना फॉन्सिस, वैशाली मिडगुले, मंगल चौधरी व बाळाबाई माने यांनी ई-मेलद्वारे संबंधित मान्यवरांना कळवली आहे.


