शबनम न्यूज | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यामुळे घटनात्मक नियमानुसार त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार असून, त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त होणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागेवर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
पार्थ पवार यांनी यापूर्वी २०१९ साली मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर पार्थ पवार सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर राहिले होते.
आता राज्यसभेच्या माध्यमातून पार्थ पवार आपली राजकीय कारकीर्द नव्याने सुरू करू शकतात, अशी चर्चा आहे. त्यांना राज्यसभेवर संधी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे संकेत म्हणूनही या घडामोडीकडे पाहिले जात आहे. विशेषतः अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी आणि पुढील पिढीचे नेतृत्व पुढे आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.
दरम्यान, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार असल्याने एकीकडे इतिहास घडत असताना, दुसरीकडे पार्थ पवार यांच्या संभाव्य राज्यसभा प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे आकाराला येण्याची चिन्हे दिसत आहेत.


