अजित पवार यांचं नेतृत्व कायम स्मरणात राहील
शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्राने आज एक खंबीर आधार गमावल्यासारखी भावना मनात दाटून आली आहे, असे भावनिक शब्दांत नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे) यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारणातील गोंधळ आणि अनिश्चिततेच्या काळात ज्यांच्याकडे लोक आशेने पाहत होते असे नेतृत्व म्हणजे ‘दादा’ होते, असे नमूद करत त्यांनी अजित पवार यांच्या निर्णयक्षमता, स्पष्ट आणि ठाम भूमिका तसेच कोणाचाही दबाव न घेता योग्य ते करण्याची हिंमत या गुणांचा उल्लेख केला.
“दादा बोलतो तसा करतो” हे शब्द केवळ एक ओळ नव्हती, तर लाखो कार्यकर्ते आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला दृढ विश्वास होता, असे सांगत डॉ. घोडेकर म्हणाल्या. शब्दांच्या भुरळीत न पडता कृतीतून विश्वास निर्माण करणारे आणि जबाबदारीपासून कधीही न पळणारे नेतृत्व म्हणून अजित पवार ओळखले जात होते.
काळ कठीण होता, आहे आणि राहील, मात्र अशा प्रत्येक काळात दादांचं नेतृत्व धैर्य देणारं ठरलं, असे त्या म्हणाल्या. त्यांनी घेतलेले निर्णय, उचललेली पावलं आणि उभा केलेला आत्मविश्वास महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
“भाषण विसरली जातात, पण काम बोलत राहतं,” असे सांगत त्यांनी अजित पवार यांच्या विकासकामांचा उल्लेख केला आणि दादांचं काम आजही मनात आहे आणि उद्याही बोलत राहील, असे स्पष्ट केले.
महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्याविना अपूर्ण वाटतं, अशी उणीव शब्दांत मांडता येणार नाही. दादा आठवणींत, विचारांत आणि चर्चेत कायम जिवंत राहतील, असे सांगत नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे) यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


