शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवऱ्यापासून घटस्फोट मिळवून देण्याचं आमिष दाखवत एका ४३ वर्षीय महिलेशी सुरुवातीला भावनिक जवळीक साधून, नंतर लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे फोटो व व्हिडिओ गुपचूप काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुढे हेच फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने महिलेकरिता तब्बल २१ लाख ४५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. पोलिसांनी रोहित उत्तमराव लाडके (वय ३२) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार २०१९ ते जानेवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील फुरसुंगी परिसरात घडल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिचा विश्वास संपादन करून नवऱ्यापासून घटस्फोट मिळवून देत तिच्याशी लग्न करण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
या काळात आरोपीने नकळतपणे महिलेचे खासगी फोटो व व्हिडिओ चित्रीत केले. नंतर हेच फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने महिलेवर दबाव टाकला. या भीतीपोटी पीडितेने आरोपीला टप्प्याटप्प्याने रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने रोख १८ लाख रुपये, सोन्या-चांदीचे दागिने, एक मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण २१ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज उकळला आहे. अखेर मानसिक त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरोधात फसवणूक, बलात्कार, खंडणी, धमकी आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


