शबनम न्यूज | प्रतिनिधी
ढोल-ताशांचा निनाद, टाळ्यांचा गजर आणि उत्साहाची लाट अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवडकरांनी ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे जल्लोषात स्वागत केले. वेग, शिस्त आणि खेळभावनेचा संगम असलेली ही स्पर्धा नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सायकलपटूंचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन होताच लक्ष्मी चौक ते आकुर्डी या मार्गावर ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची हजारोंच्या संख्येने दुतर्फा गर्दी जमली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेने या स्पर्धेच्या अनुषंगाने जय्यत तयारी करीत शहरातील प्रमुख मार्गांसह तसेच चौकांमध्ये ठिकठिकाणी फुलांची आकर्षक सजावट केली होती.
‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला आज प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. टी.सी.एस. सर्कल, हिंजवडी येथून सुरू झालेल्या या टप्प्याचा समारोप डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी, रावेत येथे झाला. याठिकाणी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील विजेत्यांचा सन्मान खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, राजाराम सरगर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार यांच्यासह महापालिका तसेच विविध उद्योग समूहांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यावेळी उपस्थित होते.
‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील एकूण अंतर ९१.८ किलोमीटर होते. या टप्प्याची सुरुवात टी.सी.एस.सर्कल, हिंजवडी येथून झाली. स्पर्धा सुरू असतानाच रस्त्यांवर सायकलपटू वेग आणि क्षमतेचा सुरेख मिलाफ सादर करताना दिसले. काही ठिकाणी तीव्र वळणे, चढ-उतार असल्याने स्पर्धकांसमोर आव्हाने होती. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू आत्मविश्वासाने ही आव्हाने पेलताना दिसून आले. मार्गावरील ठरावीक ठिकाणी वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, तांत्रिक मदत वाहने तसेच रिफ्रेशमेंट पॉइंट्स सज्ज ठेवण्यात आले होते. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोटरसायकल पथकांच्या माध्यमातून सातत्याने स्पर्धा परिसराचे निरीक्षण करण्यात येत होते.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लक्ष्मी चौक येथे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सायकलपटूंचे आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हे सायकलपटू लक्ष्मी चौक–भूमकर चौक–डांगे चौक–श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट येथे पोहोचले. यावेळी लक्ष्मी चौक ते आकुर्डी या मार्गावर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी होती. स्पर्धेच्या समारोपस्थळी सायकलपटूंचे पिंपरी चिंचवडकरांनी जल्लोषात स्वागत केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले. विशेष करून यावेळी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे सूक्ष्म नियोजन
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली होती. स्पर्धा मार्गाची पाहणी करून वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य सेवा तसेच आपत्कालीन सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले. काही कालावधीसाठी मार्गांवर वाहतूक वळविण्यात येऊन आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बंद ठेवण्यात आले होते. याशिवाय स्पर्धा मार्गावर चौकाचौकांत उद्यान विभागाच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा
पिंपरी चिंचवड शहरात ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या ऐतिहासिक सायकलिंग स्पर्धेच्या निमित्ताने शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये खेळाप्रती उत्साह निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत शहराच्या सौंदर्यीकरणाचा हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. या भित्तिचित्रांमध्ये केवळ सायकलिंगच नव्हे, तर विविध खेळांतील दिग्गज खेळाडूंचा गौरव करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा आणि संस्कृतीचे दर्शनही या भिंतींवर घडत होते. या कलेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये क्रीडा उत्सवासाठी योग्य वातावरणनिर्मिती झाली आहे.
हे आहेत स्पर्धेतील विजेते
प्रथम – मॉडगवे लोके (Modgway Loke)
द्वितीय – सँटी आर्ने (Santy Arne)
तृतीय – जॉर्जिओस (Georgios )
बेस्ट इंडियन रायडर – हशवीर सिंग (Hashveer Singh)
बेस्ट यंग रायडर – स्पिएरो तामार (Spiero TaMar)
बेस्ट एशियन रायडर – साइनबायर (Saainbayarr)
किंग ऑफ माऊंटन – रायलेआनू क्रिस्टियन (Raileanu Cristian)
२३ जानेवारी २०२६ रोजी देखील पिंपरी चिंचवडकरांना अनुभवता येणार पुणे ग्रँड टूरचा थरार
बजाज पुणे ग्रँड टूरचा महत्त्वाचा टप्पा मंगळवार, २३ जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड शहरातून जाणार असून, या टप्प्याची सुरुवात दुपारी १.३० वाजता श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे-बालेवाडी येथून होणार आहे. बालेवाडी स्टेडियममधून निघाल्यानंतर ही स्पर्धा पुण्यातील अनेक टप्पे पार करत राजीव गांधी पूल (औंध), काळेवाडी फाटा, बास्केट ब्रिज (रावेत), डी. वाय. पाटील कॉलेज (आकुर्डी), भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर चौक, इंद्रायणी नगर चौक, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल, स्पाईन रोड, जुना आरटीओ रस्ता, आयुक्त बंगला व एम्पायर इस्टेट ब्रिज मार्गे पुन्हा काळेवाडी फाटा आणि राजीव गांधी पूल (औंध) येथून पुण्याकडे जाणार आहे. या टप्प्याचा समारोप दुपारी ४ वाजता जंगली महाराज रोड येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून, या दिवशी देखील पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे.


