शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे 20/01/2026 दि. 19 /01/2026 रोजी पिंपळोली(शेळकेवाडी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन मा. राजेंद्र शेलार माजी अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ औंध यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटणाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे मा. प्राचार्य,प्रो. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. राजेंद्र शेलार म्हणाले, “आजच्या धावपळीच्या युगात शहरी भागाची ग्रामीण भागाशी असलेली नाळ तुटत चालली आहे. संस्कार आणि श्रमसंस्कृती आजही ग्रामीण भागात जिवंत आहे. मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या आजच्या तरुण पिढीला शिस्त लावण्यासाठी ‘राष्ट्रीय सेवा योजने’सारखी श्रमसंस्कार शिबिरे काळाची गरज आहेत,”
ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात नेटवर्कच्या मर्यादा असल्यामुळे आजही तिथे रात्री शांतता असते. सकाळी रानात जाणारी गुरे, सायंकाळी त्यांचे परत येणे आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे निसर्गरम्य वातावरण फक्त ग्रामीण भागातच अनुभवायला मिळते. अशा वातावरणात राहिल्याने विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि कष्टाची ओढ निर्माण होते.
यावेळी माजी आदर्श सरपंच मा. बाबाजी शेळके आणि मा. नवनाथ शेळके यांनीही शिबिरास भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला डॉ. सविता पाटील, प्रा डॉ. देवकी राठोड, प्रा. सुशीलकुमार गुजर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत एन. एस. एस. चे प्रोग्राम ऑफिसर डॉ. बाळासाहेब कल्हापुरे यांनी केले, तर डॉ. संतोष भुजबळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.


