शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी काढण्यात येणार आहे. ही सोडत सकाळी ११ वाजता मुंबईतील मंत्रालयाच्या परिषद सभागृहात होणार असून नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
या सोडतीमध्ये मुंबई महानगरपालिका (BMC), पुणे महानगरपालिका (PMC), पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर यांच्यासह राज्यातील एकूण २९ महत्त्वाच्या महानगरपालिकांचा समावेश आहे.
१५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या मतदानानंतर आणि १६ जानेवारीला जाहीर झालेल्या निकालांनंतर आता महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. महिला, ओबीसी, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) किंवा खुला प्रवर्ग यापैकी कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या शहरात असेल, हे या सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे.
आरक्षण निश्चित झाल्यानंतर साधारणपणे सात दिवसांची नोटीस देऊन महापौर पदाची प्रत्यक्ष निवडणूक घेतली जाते. यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीची निवडणूक २८ जानेवारी २०२६ रोजी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


