शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पिफ)त मराठी चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘बाप्या’, ‘जीव’, ‘तिघी’, ‘सोहळा’ आणि ‘गोंधळ’, या चित्रपटांना प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या.
बाप्या, जीव, गोंधळ आणि तिघी हे चित्रपट मराठी चित्रपट स्पर्धेत असून, सोहळा हा चित्रपट ‘आजचा मराठी सिनेमा’ या विभागात दाखवण्यात आला. गोंधळ या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी रंग लागली होती.
लिंग बदलावर आधारित ‘बाप्या’
व्यक्तीची लिंग ओळख आणि कुटुंब, समाजाच्या मानसिकतेवर संयत पण प्रभावी भाष्य करणारा ‘बाप्या’ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पिफ)त मराठी स्पर्धा विभागात प्रदर्शित करण्यात आला. गिरीश कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कोकणातील दापोलीच्या पार्श्वभूमीवर चित्रित करण्यात आलेल्या या चित्रपटात लिंग बदल आणि त्याला समाजाकडून मिळणारा प्रतिसाद या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटानंतर बोलताना दिग्दर्शक समीर तिवारी म्हणाले, की लिंग बदल हा विषय चित्रपटासाठी अवघड आणि प्रथमच मराठीमध्ये हाताळण्यात आला आहे.
अभिनेते गिरीश कुलकर्णीच्या म्हणाले, “अत्यंत संवेदनशील असा हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात आला आहे.“
परंपरेच्या पलीकडला ‘सोहळा’
माणसाच्या जबाबदारीच्या नात्याचा शोध घेणारा ‘सोहळा’ हा सैकत बागबान दिग्दर्शित चित्रपट केवळ एका कथानकापुरता मर्यादित राहत नाही, तर आजच्या बदलत्या सामाजिक वास्तवावर थेट भाष्य करतो. बालपणापासून प्रौढत्वाकडे जाण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि जीवनाच्या कठीण सत्याला सामोरे जाण्याचा प्रवास म्हणजे ‘सोहळा’.
दिग्दर्शक बागबान यांनी या कथेला स्वतःच्या अनुभवातून आकार दिला आहे. त्यांनी एका रस्त्यावर एका मुलाला बापाची चप्पल घालून चालताना पाहिलं, पण तो मुलगा अचानक चप्पल काढून टाकतो. “माझा बाप अनवाणी चालतोय, तर मी का चालू?” हा विचार त्यांच्या मनात घर करून बसला आणि त्यातूनच ‘सोहळा’ची संकल्पना जन्माला आल्याचे त्यांनी सांगितले.
“का फुलाच्या नशिबी निखारा” या चित्रपटातील गाण्याला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.


