शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पहिल्या संविधान गीताचे लोकार्पण, ‘वंदे संविधान’ काव्यसंमेलन, क्रांतिसूर्य सावित्रीज्योती पुस्तकाचे प्रकाशन आणि संविधान गीतकार प्रा. शंकर आथरे यांचा सन्मान अशा अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बंधुता प्रकाशनाच्या संचालिका मंदाकिनी रोकडे यांनी दिली.
विश्वबंधुता साहित्य परिषद, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन या संस्थांच्या वतीने येत्या शनिवारी (ता. २४ जानेवारी) सकाळी १० वाजता नवी पेठेतील पत्रकारभवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभामध्ये ज्येष्ठ साहित्यिका आणि विचारवंत ऍड. प्रार्थना सदावर्ते व साहित्यिक डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांच्या हस्ते ‘क्रांतिसूर्य सावित्रीज्योती’ पुस्तकाचे प्रकाशन, संविधानाचे पहिले गीतकार प्रा. शंकर आथरे यांना मानपत्र प्रदान केले जाईल. प्रसंगी स्वागताध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, प्रा. चंद्रकांत वानखेडे, संगीता झिंजुर्के यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
‘वंदे संविधान’ काव्यसंमेलनामध्ये महाराष्ट्रातील ३० नामांकित कवींचा सहभाग राहील. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुलभा मुंगी, डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. सविता पाटील, प्रा. भारती जाधव, सीमा गांधी, पौर्णिमा वानखेडे, प्रा. सायली गोसावी आणि प्रा. प्रशांत रोकडे यांनी विशेष पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.


