शबनम न्यूज | प्रतिनिधी
मावळ तालुक्यात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, वंचित बहुजन आघाडी तसेच मनसे हे पक्ष एकत्र येऊन निवडणूक रणांगणात उतरणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे, उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, युवा अध्यक्ष उमेश गावडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे, तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ, गणेश काजळे, राजीव फलके, सहादू आरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गण याठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. सर्व पक्षांमध्ये जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या तालुक्यात सत्ताधारी पक्षाकडून विकासाच्या नावाखाली केवळ दिखावूपणा सुरू असून, सामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व लोकहिताच्या मुद्द्यांवर आधारित राजकारण करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
आघाडी सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या लोकाभिमुख योजना, सामाजिक न्याय, ग्रामीण विकास, रोजगारनिर्मिती आणि शेतकरी हिताच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाणार असून, जनतेचा विश्वास महाविकास आघाडीवर असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष समन्वयाने प्रचार करणार असून, प्रत्येक बुथवर मजबूत संघटन उभारून निवडणुकीत निर्णायक विजय मिळवण्याचा निर्धारही यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.


