शबनम न्यूज | प्रतिनिधी
भंगार विक्रीच्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नीची काठीने मारहाण करून तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी (दि. १७) सकाळी म्हाळुंगे येथील कांझी हॉटेलजवळ उघडकीस आली.
या प्रकरणी दत्ता काळुराम जगताप (वय ३०, रा. बेबड ओहळ, मुळशी) याला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. कुसुम वसंत पवार (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुम यांच्या पहिल्या पतीचे निधन झाले असून त्यांना तीन मुले आहेत. त्यानंतर त्या आणि त्यांच्या पतीचा भाऊ दत्ता जगताप हे पती-पत्नी म्हणून एकत्र राहत होते. दोघेही भंगार गोळा करणे व मासेमारी अशी कामे करून उदरनिर्वाह करत होते.
भंगार विक्रीतून मिळालेल्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपी दत्ताने कुसुम यांना शिवीगाळ करून काठीने डोके, मान व पोटावर बेदम मारहाण केली. कुसुम खाली कोसळल्यानंतर आरोपीने दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारून त्यांची हत्या केली.
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी महिलेलाही आरोपीने काठीने मारहाण केली असून त्यांच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली आहेत.
घटनेचा पुढील तपास बावधन पोलीस करत आहेत.


