शबनम न्यूज | प्रतिनिधी
आज शनिवार, दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भरघोस यश संपादन केल्याबद्दल शहरातील आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार अमित गोरखे आणि आमदार उमाताई खापरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.
पिंपरी-चिंचवड शहरात मिळालेल्या या ऐतिहासिक यशाबाबत समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मतदारांनी दाखवलेला विश्वास हा आपल्या सर्वांच्या प्रामाणिक व विकासाभिमुख कार्यामुळेच मिळाला आहे. हा विश्वास भविष्यातील कामातून अधिक दृढ करावा, अशा सूचना त्यांनी चारही आमदारांना दिल्या.
तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले. “सर्वांनी जोमाने कामाला लागून जनतेच्या समस्या सोडवाव्यात व विकासकामांना गती द्यावी,” असा स्पष्ट संदेश त्यांनी शहरातील या चारही आमदारांना दिला.
मुख्यमंत्र्यांच्या या मार्गदर्शनामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


