spot_img
spot_img
spot_img

मातंग समाजाचा भाजपला बिनशर्त जाहीर पाठिंबा; भाजपची ताकद वाढणार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेच्या वतीने भारतीय जनता पार्टीला (भाजप) बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या राजकीय ताकदीत लक्षणीय वाढ होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेचे शहर व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खंदारे यांनी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मा. शत्रुघ्न (बापू) काटे यांना अधिकृत पत्राद्वारे पाठिंबा जाहीर केला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी बालाजी कांबळे, गिरीश सोनवणे आणि भिमराव बरगडे उपस्थित होते.

संघटनेच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्यात कार्यरत असलेल्या सरकारने मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण व सकारात्मक निर्णय घेतले आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना, विकासकामे तसेच सामाजिक न्यायाच्या दृष्टीने घेतलेले निर्णय हे कौतुकास्पद असून त्यातून समाजाला प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

मातंग समाजाच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली तसेच संघटनेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपभाऊ कांबळे, आमदार अमित गोरखे आणि आमदार उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले. भाजपने मातंग समाजाच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत ठोस पावले उचलली असल्याने समाजात भाजपविषयी सकारात्मक भावना निर्माण झाल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरातील आगामी महानगरपालिका निवडणुकीत मातंग समाज मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहील आणि भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतदान करेल.

मातंग समाजासारख्या संघटित घटकाचा जाहीर पाठिंबा मिळाल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपची बाजू अधिक भक्कम होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून, या निर्णयाकडे निवडणुकीतील महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!