शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराचा विकासाचा स्पष्ट आराखडा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार आकाश पंकज चतुर्वेदी यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपला वचननामा जाहीर केला आहे. “विकासाचा प्रवास… जनतेचा विश्वास…” या संकल्पनेतून त्यांनी प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठोस विकासात्मक दिशा मांडली आहे.
या वचननाम्यामध्ये प्रभाग क्रमांक १९ मधील सर्व घटकांचा समावेश असलेला संतुलित विकास साधण्यावर भर देण्यात आला आहे. निवडून आल्यानंतर प्रभागातील सर्व नागरिकांच्या प्रगतीसाठी शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्याची हमी आकाश चतुर्वेदी यांनी दिली आहे. महिलांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र उभारणे, रोजगाराभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प वचननाम्यात नमूद करण्यात आला आहे.
प्रभागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी जलद गतीने रस्ते विकास, नदी सुधार प्रकल्प राबविणे, आरोग्य सेवांसाठी जनजागृती मोहिमा राबविणे, प्रत्येक समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारणे, सार्वजनिक वाचनालये सुरू करणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तरुणांसाठी व्यायामशाळा, क्रीडासुविधा उपलब्ध करून देणे आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
यासोबतच प्रभागात सार्वजनिक शौचालये, आरोग्य तपासणी केंद्रे, गरजू महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच प्रभागातील नागरिकांसाठी विवाह सोहळ्यांसाठी हॉल उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक स्वच्छता संस्थांच्या क्षेत्रात आवश्यक सुविधा विकसित करून परिसर अधिक स्वच्छ व आरोग्यदायी बनवण्याचा निर्धारही वचननाम्यात व्यक्त करण्यात आला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १९ च्या समृद्धीसाठी कार्य करण्याची संधी नागरिकांनी द्यावी, असे आवाहन आकाश चतुर्वेदी यांनी केले आहे. एकूणच हा वचननामा म्हणजे प्रभाग क्रमांक १९ च्या विकासाचा स्पष्ट रोडमॅप असून, मतदारांमध्ये याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.


