पिंपरी गावासह विविध परिसरात प्रचार फेऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्रमांक २१ मध्ये भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युतीच्या अधिकृत उमेदवारांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. पिंपरी गाव, वैभवनगर, मिलिंदनगर, जिजामाता हॉस्पिटल परिसर तसेच अशोक थिएटर परिसरात झालेल्या प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महायुतीचे अधिकृत उमेदवार उषाताई वाघेरे, मोनिकाताई निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी हे चारही उमेदवार जोमाने प्रचारात सहभागी असून घराघरांत जाऊन, व्यापारी संकुलांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचार फेऱ्यांमुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
प्रचारादरम्यान स्थानिक व्यापारी, उद्योजक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेत सविस्तर चर्चा करण्यात आली. या संवादातून नागरिकांनी प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा तसेच व्यापारी विकासाशी संबंधित विविध समस्या आणि अपेक्षा उमेदवारांसमोर मांडल्या. यावर उमेदवारांनी प्रत्येक मुद्दा लक्षपूर्वक ऐकून घेत ठोस आणि विकासाभिमुख भूमिका मांडली.
भाजपा–आरपीआय (आठवले) युतीच्या उमेदवारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट आराखडा मांडत स्वच्छ व सुरक्षित परिसर, सुधारित आरोग्य सुविधा, व्यापाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण, तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. “विकास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व” हेच आपल्या कामाचे सूत्र असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
यावेळी भाजपा–आरपीआय (आठवले) युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनीही विकासाच्या या संकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत युतीवर विश्वास व्यक्त केला असून, आगामी काळात प्रभागाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांना मिळणारा हा वाढता जनसमर्थन विजयाचा मार्ग अधिक मजबूत करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून, प्रभाग क्रमांक २१ मध्ये महायुतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.


