दररोज नळाद्वारे पाणीपुरवठ्यापासून ट्रॅफिकमुक्त शहरापर्यंत अनेक ठोस हमी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संयुक्तरित्या विकासाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण व लोकाभिमुख हमी देण्यात आल्या आहेत.
आज पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे, आमदार रोहित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष योगेश बहल, तुषार कामठे, माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे, कविता आल्हाट, यांच्या सह शहरातील अनेक आजी माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
या जाहीरनाम्यात सर्वप्रथम दररोज नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची ठोस हमी देण्यात आली आहे. तसेच नदी पुनर्जीवन प्रकल्प प्रभावीपणे राबवून नद्यांवरील प्रदूषण पूर्णतः नियंत्रणात आणण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहर खड्डेमुक्त व ट्रॅफिकमुक्त करण्यासाठी भरीव उपाययोजना राबवण्यात येतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत पिंपरी-चिंचवड शहराला देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचे उद्दिष्ट जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. यासाठी व्यापक स्वच्छता अभियान, कचरा व्यवस्थापनाचे आधुनिक तंत्रज्ञान आणि नागरिकांच्या सहभागावर भर देण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात हायटेक आरोग्य सुविधा, अद्ययावत रुग्णालये, मोफत तपासण्या आणि सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या उपचार सेवा उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली आहे.
शहराचा नियोजित विकास साधण्यासाठी विद्यमान डीपी प्लॅन रद्द करून नवीन, लोकहिताचा आणि शाश्वत डीपी प्लॅन तयार केला जाईल, असेही जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळांना पीसीएमसी मॉडेल स्कूल म्हणून विकसित करून दर्जेदार व आधुनिक शिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.
यासोबतच महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगारनिर्मिती, स्टार्टअप्सना प्रोत्साहन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना, झोपडपट्टी पुनर्वसन, हरित पिंपरी-चिंचवड संकल्पना, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून डिजिटल सेवा तसेच प्रशासनात उत्तरदायित्व व पारदर्शकता वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “हा जाहीरनामा केवळ आश्वासनांचा नसून पिंपरी-चिंचवड शहराला पुढील अनेक वर्षांसाठी विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा रोडमॅप आहे. नागरिकांच्या विश्वासावर आम्ही उतरू आणि दिलेल्या प्रत्येक हमीची अंमलबजावणी करू.”
एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाबाबत ठोस दिशा मिळाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जाहीरनाम्याची शहरात मोठी चर्चा सुरू आहे.


