संयुक्त प्रचाराला सुरुवात; निवडणूक लढतीत राष्ट्रवादीला बळ
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ मध्ये महत्त्वाची राजकीय घडामोड घडली असून अखिल भारतीय जनता दल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक २३ मधील निवडणूक समीकरणे बदलण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे.
या जाहीर पाठिंब्याअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण बारणे, विशाल बारणे, मालिका साकळे आणि योगिता बारणे यांना अखिल भारतीय जनता दलाच्या वतीने अधिकृत पाठिंबा देण्यात आला आहे. येत्या काळात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून संयुक्त प्रचार, बैठका, पदयात्रा आणि मतदारसंवाद कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अखिल भारतीय जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आतापर्यंत प्रभागात केलेली विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि सर्वसमावेशक विकासाची भूमिका पाहता हा पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. “स्थानिक प्रश्नांची जाण असलेले, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करणारे उमेदवार राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रचारादरम्यान पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी हे प्रमुख मुद्दे असल्याचे उमेदवारांनी सांगितले. या सर्व प्रश्नांवर प्राधान्याने काम करून प्रभाग क्रमांक २३ चा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.
या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभागातील विविध सामाजिक घटक, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. संयुक्त प्रचारामुळे मतदारांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचता येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला
अखिल भारतीय जनता दलाच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा आत्मविश्वास वाढला असून निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराला अधिक गती मिळण्याची चिन्हे आहेत. “सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या दिशेने काम करण्याचा आमचा संकल्प आहे,” असे उमेदवारांनी सांगितले.
या राजकीय घडामोडीमुळे प्रभाग क्रमांक २३ मधील निवडणूक अधिक चुरशीची बनली असून, येथील लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


