spot_img
spot_img
spot_img

‘अरे संसार संसार…’ ही कविता आजही समर्पक! – आमदार शंकर जगताप

पिंपरी : ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ‘अरे संसार संसार…’ ही कविता आजही समर्पक आहे! त्यांनी सांगितलेले जीवनाचे सत्य अनुसरून लेवा पाटीदार मंडळे पिंपरी – चिंचवडच्या प्रगतीमध्ये सातत्याने आपले योगदान देत आहे!’ असे गौरवोद्गार चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांनी निळू फुले प्रेक्षागृह, सांगवी येथे शनिवार, दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी काढले. लेवा पाटीदार मित्रमंडळ, सांगवी, पुणे आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई प्रतिष्ठान आयोजित; तसेच पाटील टुर्स ग्रुप ऑफ कंपनी प्रायोजित ‘जीवनगाथा बहिणाबाईंची…’ या निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावरील पन्नास कलाकारांनी सादर केलेल्या भव्यदिव्य रंगमंचीय आविष्काराचे उद्घाटन करताना आमदार शंकर जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे होते; तसेच पिंपरी – चिंचवड महापालिका माजी सभागृह नेता नामदेव ढाके, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, सुजाता इळवे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, लेवा पाटीदार मित्रमंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे, सचिव महेश बोरोले, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील यांची व्यासपीठावर; तसेच पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे आणि विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
रविराज इळवे यांनी अध्यक्षीय मनोगतातून बहिणाबाई यांच्या कोणत्याही रचना रूढार्थाने प्रेम कविता नव्हत्या तरीही त्या अजरामर झालेल्या आहेत!’ असे मत व्यक्त केले. पंकज पाटील यांनी प्रास्ताविकातून, ‘मनोरंजनातून संस्कृतीच्या संचिताकडे नेणारा बहिणाबाईंच्या जीवनावरील हा कार्यक्रम आहे. स्वर्गीय प्राध्यापिका कमल पाटील यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे, तसेच सुमारे तेरा वर्षांनंतर उद्योगनगरीत हा प्रयोग पुन्हा होत आहे. ‘ अशी माहिती दिली. शारदा सोनवणे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले; तर श्रीकांत चौगुले यांनी, ‘आचार्य अत्रे यांच्यामुळे पहिल्यांदा बहिणाबाईंच्या कविता महाराष्ट्राला माहीत झाल्या. खानदेशी माती आणि संस्कृती यांचा अस्सल गंध असणारा जीवनानुभवावर आधारित साहित्य ठेवा हा मराठी भाषेतील अनमोल ठेवा आहे!’ असे विचार मांडले. कार्यक्रम सादर करणारे भुसावल येथील सांस्कृतिक कलानिकेतन ग्रुपचे दिग्दर्शक मुकेश खपली आणि संगीतकार शंभू गोडबोले यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
‘जीवनगाथा बहिणाबाईंची…’ या प्रयोगाचा प्रारंभ सरस्वतीवंदन करून करताना कलाकारांच्या आकर्षक वेषभूषा, नेत्रदीपक नेपथ्य आणि लयबद्ध नृत्याविष्काराने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. खानदेशच्या पोवाड्यातून खानदेशातील समृद्ध परंपरेची ओळख करून देण्यात आली. नेहा खपली वढवेकर यांच्या बहिणाबाईंची भूमिकेतील लेवा गणबोलीतील निवेदनातून बहिणाबाईंची जीवनकहाणी उलगडत असतानाच त्या त्या प्रसंगाचे दृश्यरूप कलाकारांनी आपल्या अभिनयातून साकार केले. त्यामुळे शेतकरी कुटुंब, त्यांचे घर, त्यांचे काबाडकष्ट, त्यांचे सणवार, आनंद अन् दुःखाचे उत्कट प्रसंग, नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याची जिद्द प्रेक्षकांच्या मनाला भावत गेली; आणि प्रत्येक प्रसंगाच्या सादरीकरणाला टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. प्रसंगानुरूप बहिणाबाईंच्या अजरामर गीतांच्या नेटक्या सादरीकरणामुळे खानदेशी संस्कृतीची महती उपस्थितांच्या अंत:करणात रुजत गेली. प्रेक्षकांमधून रंगमंचावर आलेल्या दिंडीमुळे प्रेक्षागृहातील संपूर्ण वातावरण भक्तिरसात चिंब झाले; तर केळीच्या बागेत राबणारा घरधनी, अंगणातल्या तुळशी वृंदावनाची पूजा करणारी सुवासिन, मुऱ्हाईबरोबर माहेराला येणारी सासुरवाशीण, नदी काठावर धुणी धुणाऱ्या माय बहिणींचे उखाणे, दिवाळी, अखजी, गुढीपाडवा अशा सणांमधून भावजीवनाचे दर्शन घडत असताना मन कधी गावाकडे पोहोचले ते रसिकांनाही कळलेच नाही. निसर्गकन्या बहिणाबाईंच्या अंतकाळाच्या प्रसंगाने सर्वांना सद्गदित केले. प्रयोगाच्या समारोपप्रसंगी रंगमंचावर उपस्थित झालेल्या सर्व पन्नास कलाकारांना प्रेक्षकांनी नि:शब्द अवस्थेत उभे राहून मानवंदना दिली.
     संजय भंगाळे, डॉ मिलिंद चौधरी, नीना खर्चे, अमोल पाटील, पुरुषोत्तम पिंपळे, देवेंद्र पाटील, देवेंद्र भारंबे, राकेश वायकोळे, लक्ष्मण शिंदे, दिनकर मोरे, सुरेश कंक, राजेंद्र येडे, किशोर शिंदे, रघुनाथ फेगडे, विजय जावळे, विकास कोरे, अशोक तळेले, हर्षाली नेहेते, भूषण गाजरे, वैशाली चौधरी, विलास पाटील, माधवी लोमटे, संजना अत्तरदे, हिमानी चौधरी, सचिन वाणी, भूषण पाटील, डॉ. लीलाधर पाटील, कैलास रोटे, महेश पाटील, मधुकर पाचपांडे,  यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!