शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून प्रभाग क्रमांक १९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या मैदानात आपली ताकद पणाला लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे, दीपक हिरालाल मेवानी, आसवानी सविता धनराज, पवार काळूराम मारुती हे चौघेही ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रचारादरम्यान उमेदवार घरोघरी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या अडचणींवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात येत आहे. विकासाच्या मुद्द्यांवर आधारित सकारात्मक प्रचारामुळे प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वातावरण मजबूत होत असल्याचे चित्र आहे.
विकासकामांचा लेखाजोखा मांडत मतदारांशी संवाद
उमेदवारांनी आपल्या प्रचारात आतापर्यंत केलेल्या कामांचा सविस्तर आढावा मतदारांसमोर मांडला आहे. कोविड-१९ च्या कठीण काळात हजारो नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच प्रभागातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, पुलांची मजबुतीकरणाची कामे, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना, पाणीपुरवठा सुधारणा, नवीन पाईपलाईन टाकणे, स्ट्रीट लाईट बसवणे आणि सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्यात आला असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
याशिवाय महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व गोरगरिबांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहिल्यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
‘घड्याळ’ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभागातील मतदारांना ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावर मतदान करून विकासाच्या मार्गाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. “जनतेच्या विश्वासावर खरे उतरून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे उमेदवारांनी सांगितले.
१५ जानेवारी रोजी मतदान
प्रभाग क्रमांक १९ साठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराला वेग आला असून या प्रभागातील लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


