spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ : प्रभाग क्रमांक २१ मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ बॉक्स नकली दारू जप्त

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच प्रभाग क्रमांक २१ मध्ये घडलेल्या एका खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण शहरात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात नकली दारू पकडल्याने निवडणूक प्रक्रियेतील बेकायदेशीर प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सुमारे ११ बॉक्स नकली दारू जप्त केली असून, ही दारू मतदारांना वाटप करण्यासाठी नेली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, दारू वाटप करणारे पाच ते सहा जण घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले.

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू आसवाणी आणि संदीप वाघेरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ निवडणूक आयोग तसेच पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांना घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच निवडणूक अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित वाहनासह घटनास्थळी आढळलेले सर्व नकली दारूचे बॉक्स ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उमेदवार डब्बू आसवाणी आणि संदीप वाघेरे यांनी प्रशासनासमोर गंभीर सवाल उपस्थित केला.
“जर ही नकली दारू मतदारांपर्यंत पोहोचली असती आणि त्यातून कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाला असता, तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, डब्बू आसवाणी यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वाहन चालविणारा मनिष नरेश पंजाबी असून, त्याच्यासोबत स्वप्नील कांबळे आणि किरण वाघेरे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच बुलेट दुचाकीवरून दोन ते तीन जण घटनास्थळावरून फरार झाल्याची माहितीही समोर आली आहे.

या घटनेमुळे निवडणूक काळात होणाऱ्या दारू वाटप, नकली माल आणि बेकायदेशीर हस्तक्षेपांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन पुढे कोणती ठोस कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!