spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत महिला सक्षमीकरणाला गती देणार – आ. अण्णा बनसोडे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून घरोघरी प्रचाराला वेग आला असून, विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी खराळवाडी परिसरात घरोघरी भेटी देत महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी महिलांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करताना, महिला सक्षमीकरणासाठी सर्वोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ठाम ग्वाही आमदार बनसोडे यांनी दिली.

महिलांशी संवाद साधताना आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून ते आमदार म्हणून पिंपरीकरांच्या सुख-दुःखात सहभागी आहेत. नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाची दिशा जवळून अनुभवलेली असल्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून विकासकामे प्रभावीपणे कशी करून घ्यायची, याचा मोठा अनुभव आपल्याकडे आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समिती सभापती म्हणून यापूर्वी काम करताना अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गी लावल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला भरघोस मतदान करून विजयी करण्याचे आवाहन करताना आमदार बनसोडे यांनी सांगितले की, महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ महिलांपर्यंत अधिक प्रमाणात पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण, कर्ज सुविधा, बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच स्वयंरोजगाराला चालना देणे हे आपले प्राधान्य राहील. यासाठी आपले कार्यालय सदैव महिलांच्या सेवेसाठी तत्पर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी खराळवाडीतील महिलांनी आपल्या अडचणी मांडताना पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता, महिलांची सुरक्षितता, स्ट्रीट लाईट, तसेच बचत गटांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या सर्व बाबींची नोंद घेत, निवडणुकीनंतर प्राधान्याने पाठपुरावा करून योग्य तोडगा काढण्याची ग्वाही आमदार बनसोडे यांनी दिली.

आमदार अण्णा बनसोडे यांच्या स्पष्ट भूमिका, विकासाचा अनुभव आणि महिलांबद्दलची सकारात्मक दृष्टीकोन याचे खराळवाडीतील महिलांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित महिलांनी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

एकूणच खराळवाडी परिसरात झालेल्या या घरोघरी प्रचार मोहिमेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले असून, महिला मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!