प्रभाग १७ मध्ये परिवर्तनाची नांदी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार ज्योतीताई भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. विघ्नहर्ता श्री गणेशाचे दर्शन व आशीर्वाद घेऊन त्यांच्या निवडणूक प्रचाराचा श्री गणेशा झाला.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा तसेच तरुणांचा सहभाग लक्षणीय ठरला. प्रारंभापासूनच ज्योतीताई भालके यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद परिवर्तनाची चाहूल देणारा असल्याचे चित्र दिसून आले.
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी ज्योतीताई भालके यांनी घरोघरी भेटी देत महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. नागरिकांच्या घरासमोर औक्षण करून, पुष्पवृष्टी करत त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले. या वेळी नागरिकांनी आपल्या दैनंदिन समस्या, मूलभूत गरजा आणि अपेक्षा थेट त्यांच्यासमोर मांडल्या. त्या प्रत्येक समस्येची नोंद घेत “हे केवळ निवडणूक नव्हे, तर विकासाची सुरुवात आहे” असा विश्वास ज्योतीताईंनी नागरिकांना दिला.
या प्रसंगी बोलताना ज्योतीताई भालके म्हणाल्या, “हा केवळ माझा प्रचार नाही, तर आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासाचा लढा आहे. आज मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पष्ट सांगतो की बदलाची वेळ आता आली आहे आणि हा बदल आपण सर्व मिळून घडवणार आहोत.”
स्थानिक विकास, महिला सक्षमीकरण, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व सुरक्षा या मुद्द्यांवर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विचारधारेनुसार सामान्य जनतेचा आवाज थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले.
प्रभाग क्रमांक १७ मध्ये ज्योतीताई भालके यांच्या प्रचाराचा हा शुभारंभ राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता त्यांच्या उमेदवारीकडे नागरिकांकडून आशेने पाहिले जात आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी निर्माण झालेला हा उत्साह आगामी निवडणुकीत परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


