शबनम न्यूज | प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री, पुण्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. सुरेश कलमाडी यांच्या कार्यालयाच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने हे वृत्त दिले आहे.
गेल्या काही काळापासून ते दीर्घकालीन आजाराने त्रस्त होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी पहाटे सुमारे ३.३० वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
सुरेश कलमाडी यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. ते काँग्रेस पक्षाचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेक वर्षे पुण्यातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले. याशिवाय केंद्र सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता.
राजकारणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सुरेश कलमाडी यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. त्यांनी भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्षपद भूषवले होते. आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांमध्येही त्यांची ओळख होती. क्रीडा प्रशासनात सक्रिय भूमिका बजावत त्यांनी भारताच्या क्रीडा चळवळीला चालना देण्याचा प्रयत्न केला.
जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पुण्याचे माजी खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी (वय ८१) यांचे आज पुण्यात निधन झाले. पहाटे साडेतीनच्या सुमारास प्रदीर्घ आजारामुळे उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.”
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या सार्वजनिक जीवनात एक अनुभवी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, विविध क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.


