शबनम न्यूज | पुणे
कर्करोग संशयित, निदान झालेल्या व उपचारासाठी दाखल रुग्णांची तपशीलवार यादी ठेवावी. त्यांच्या दररोजच्या तपासण्यांचे अहवाल जसे हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तशर्करा याबाबतची माहिती अचूकपणे भरावी. तसेच जिल्हास्तरावरील अधिकारी व उपसंचालक यांनी अधिनस्त संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.
राज्यातील कर्करोग प्रतिबंध, जनजागृती आणि वेळेवर निदानासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीस सहसंचालक, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य भवन, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक परिमंडळांचे उपसंचालक, तसेच या जिल्ह्यांचे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कर्करोग जनजागृती व तपासणी मोहीम २०२५ तसेच कर्करोग निदान वाहनाच्या माध्यमातून होणाऱ्या तपासण्या यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यात ठाणे, पुणे आणि नाशिक या परिमंडळांतील कामकाजावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी मंत्री आबिटकर यांनी नवीन डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्यासाठी सूचना करून सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याबद्दल सांगितले. त्याचप्रमाणे धुलाई सेवा व आहार सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्याही सूचना दिल्या. या मोहिमेमुळे राज्यात कर्करोगासारख्या गंभीर आजारावर वेळेवर निदान व उपचार होण्यास मदत होणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.