शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शिलेदार निवडणूक रणांगणात पूर्ण ताकदीने उतरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रभागातील चारही अधिकृत उमेदवार महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
या प्रभागातून सीमाताई सावळे, राजश्रीताई गागरे, आश्विनीताई वाबळे आणि तुषार सहाणे हे चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रिंगणात असून त्यांनी प्रत्यक्ष गाठीभेटी, पदयात्रा व घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद सुरू केला आहे. प्रचारादरम्यान नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेत त्या सोडवण्यासाठी ठोस आराखडा मांडला जात आहे.
प्रभागातील पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन, रस्त्यांची अवस्था, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, स्ट्रीटलाइट, महिला सुरक्षेसह युवकांसाठी रोजगार व क्रीडा सुविधांवर विशेष लक्ष देण्याचा निर्धार या उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोयी आणि स्वच्छ, सुंदर प्रभाग उभारण्याचा संकल्पही त्यांनी मांडला आहे.
प्रचारादरम्यान स्थानिक नागरिक, महिला बचत गट, युवक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून “अजित दादांचे शिलेदार” म्हणून या चौघांवर मतदारांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत, संवाद व पाठिंबा मिळत असून वातावरण चांगलेच तापले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक ८ मध्ये संघटित आणि मजबूत प्रचार यंत्रणा काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल भक्कम कामगिरी करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.


