शबनम न्यूज | पिंपरी
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड विद्यापीठ, साते, वडगाव मावळ येथे विविध उपक्रम राबवून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
पीसीयू ग्रंथालय विभाग आणि पीसीयू स्कूल ऑफ लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात भेट दिली. उद्घाटन प्रसंगी कुलगुरु डॉ. मणिमाला पुरी आणि प्र कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यापीठाच्या विविध विभागाचे प्रमुख, शाळा विभाग प्रमुख उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे आयोजन पीसीयू लायब्ररी डॉ. मतलूब अली खान आणि स्कूल ऑफ लॉ प्रमुख प्रियांक राणा, सहाय्यक प्रा. प्रदीप कुमार यादव यांनी केले होते.
डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा, भारतीय संविधानातील त्यांच्या मोलाच्या योगदानाची तसेच त्यांच्या सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षाचा विस्तृत आढावा देणारी पुस्तके सादर करण्यात आली होती. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसह सर्व उपस्थितांना डॉ. आंबेडकरांचे विचार समजून घेण्यास प्रेरणादायी ठरले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे वर्षभर सामाजिक उत्तरदायित्व आणि शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मातई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा कुलपती हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.