शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरीतील धावडेवस्ती प्रभाग क्रमांक ६ मध्ये राजकीय चित्र स्पष्ट होत असून, भाजपने माजी नगरसेवक रवी लांडगे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधातील प्रमुख उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाल्याने, लांडगे यांचा निवडणूक मार्ग जवळपास मोकळा झाला असून बिनविरोध निवडीची शक्यता बळावली आहे.
या प्रभागात अपक्ष उमेदवार प्रसाद काटे यांचा अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांचा अर्ज जात प्रमाणपत्र सादर न केल्याने नामंजूर करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष काळुराम लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र त्यांचा अर्जच दाखल न झाल्याने ते निवडणूक रिंगणाबाहेर राहिले आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये सध्या वैध उमेदवार म्हणून केवळ भाजपचे रवी लांडगे शिल्लक राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे माघार अर्जाची मुदत संपल्यानंतर अधिकृतपणे बिनविरोध निवडीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा त्यांना अशी संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रवी लांडगे हे भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे सख्खे पुतणे आहेत. गतवर्षी त्यांनी भोसरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत महापालिकेची अधिकृत उमेदवारी दिली आहे.
धावडेवस्ती प्रभागात विरोधकांची फळी कमकुवत ठरल्याने आणि अर्ज छाननीतून अनेक उमेदवार बाद झाल्याने, या प्रभागातील निवडणूक लढत एकतर्फी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आता माघार प्रक्रियेनंतर अधिकृत घोषणा झाल्यानंतर रवी लांडगे यांची बिनविरोध निवड निश्चित होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


