शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधून ज्येष्ठ नेते राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.
दीर्घकाळ भाजपविरोधात राजकारण करणारे राहुल कलाटे यांनी अलीकडेच भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. टोकाचा विरोध असूनही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत थेट निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने प्रभाग क्रमांक २५ मधील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.
प्रभागाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने आपण ही निवडणूक लढवत असल्याचे राहुल कलाटे यांनी यावेळी स्पष्ट केले. वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसराचा नियोजनबद्ध विकास, मूलभूत सुविधा, पायाभूत सोयी-सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देणे हा आपला मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.
“पिंपरी–चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न घेऊन मी प्रभाग क्रमांक २५ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार,” अशी भावना राहुल कलाटे यांनी व्यक्त केली.
त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक २५ मधील लढत अधिक चुरशीची होणार असून आगामी निवडणुकीत हा प्रभाग विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.


