शबनम न्यूज | पुणे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवा मुख्य परीक्षा (राज्यसेवा) 2024 ही 45 दिवस पुढे ढकलावी, तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षेच्या जागा वाढव्याव्यात, अशी मागणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या मागणी करिता बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा सुधारित निकाल 29 मार्चला जाहीर झाल्यामुळे 26, 27 आणि 28 एप्रिलला होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नवीन परिपत्रकानंतर 45 दिवसांचा कालावधी मिळावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. राज्यसेवा परीक्षा 1 डिसेंबर 2024 ला झाली, 12 मार्चला निकाल जाहीर झाले त्यात मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गांचे आरक्षण लागू असतानाही काही मराठा विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यादीत समाविष्ट करण्यात आले. यामुळे इडब्ल्यूएस प्रवर्गातील अनेक विद्यार्थी अपात्र ठरले, परिणामी त्यांना मुख्य परीक्षेसाठी बसण्याची संधी मिळाली नाही. यानंतर आयोगाने 29 मार्चला सुधारित निकाल जाहीर केला, मात्र सुधारित निकालामध्येही चुका असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला तसेच परीक्षेत कटऑफ पेक्षा अधिक गुण मिळवूनही अनेक विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादीत नाव नसल्याने त्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरणांमध्ये धाव घ्यावी लागली, आयोगाचे हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेचा तयारीचा मौल्यवान वेळ वाया गेला, असे आरोपही विद्यार्थ्यांच्या मार्फत होत आहे.