शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आकाश चतुर्वेदी यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.
गेल्या वीस वर्षांपासून प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांच्या सुख-दुःखात सातत्याने सहभागी होत सामाजिक कार्य करणारे, सर्वसामान्यांशी थेट नाळ जपणारे नेतृत्व म्हणून आकाश चतुर्वेदी यांची परिसरात ठळक ओळख आहे. नागरिकांच्या अडचणी ऐकून घेणे, प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना बोलताना आकाश चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले की, “प्रभाग क्रमांक १९ चा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास हेच माझे प्रमुख ध्येय आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, युवकांसाठी संधी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस आणि परिणामकारक काम करणे ही माझी प्राथमिकता असेल.”
प्रभागातील अनेक प्रश्न आजही प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी सक्षम, लोकाभिमुख आणि सातत्याने कार्यरत असणाऱ्या प्रतिनिधीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाच्या मुद्द्यांवर विश्वास ठेवून मतदारराजा आपल्याला नक्कीच संधी देतील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन, सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत प्रभाग क्रमांक १९ चा समतोल, पारदर्शक व शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आकाश चतुर्वेदी यांनी यावेळी अधोरेखित केले.


