spot_img
spot_img
spot_img

‘संविधान शिल्पकार’ महानाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

शबनम न्यूज | पिंपरी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आणि भारताच्या संविधान निर्मितीवर आधारित ‘संविधान शिल्पकार’ नाटक पाहण्यासाठी पिंपरी चिंचवडकर नाट्य रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आशयसंपन्न कथानक, अभिनय व उत्तम सादरीकरणामुळे एक परिपूर्ण नाटक पाहण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळाली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वात बुधवारी (१६ एप्रिल) ‘संविधान शिल्पकार’ या महानाटकाचे सादरीकरण पिंपरी येथील एच.ए.मैदान येथे झाले. नागपूर येथील ‘द बोधिसत्व फाऊंडेशन’ संस्थेने सादर केलेल्या या महानाटकाने प्रबोधन पर्वाचा समारोप झाला. याप्रसंगी विचार प्रबोधन पर्वाचे संयोजक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कामगार नेते गणेश भोसले, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत पाटील, यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘संविधान शिल्पकार’ या नाटकातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष, त्यांचे कार्य, संविधान निर्माण करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आलेली आव्हाने व त्यावर त्यांनी केलेली मात, असे विविध विषय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडण्यात आले. युगनायक फेम सुप्रसिद्ध अभिनेते अथर्व कर्वे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका तर विविध पारितोषिक प्राप्त नाट्य व सिने अभिनेत्री सांची जीवने यांनी माता रमाई यांची भूमिका साकारली. या महानाटकात १५० पेक्षा जास्त कलाकारांनी सहभाग घेतला.

गीत, नृत्याने जिंकली मने

‘संविधान शिल्पकार’ महानाटकामध्ये संविधानाबाबत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबाबत जनजागृती करणाऱ्या गीतांचा देखील समावेश होता. या गीतांवर कलाकारांनी केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी रॅपर विपीन ताथड यांनी सादर केलेल्या रॅपला रसिकांनी दाद दिली.

मोबाईल टॉर्च लावून रसिकांनी दिला कलाकारांना प्रतिसाद

‘संविधान शिल्पकार’ या महानाटकाचे सर्वच प्रेक्षकांनी एकाचवेळी मोबाईल टॉर्च लावून प्रतिसाद दिला. भारतीय संविधानाच्या निर्मितीचा प्रवास सहज व सोप्या पद्धतीने या महानाटकाच्या माध्यमातून समजला असल्याच्या भावनाही यावेळी प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.

विचाराची देवाण-घेवाण करणारे पर्व!

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व २०२५ चे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ११ एप्रिल ते १६ एप्रिल २०२५ याकाळात आयोजन केले होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पर्वामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद झाले. यासर्वच कार्यक्रमांना पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. खऱ्या अर्थाने विचारांची देवाण-घेवाण करणारे हे पर्व ठरले असून महानगरपालिकेच्या या कार्यक्रमाचे विविध स्तरातून कौतूक होत आहे. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी महानगरपालिकेच्या विविध विभागांनी परिश्रम घेतले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!