शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मधून उमेदवार सागर कोकणे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येताना दिसत आहे. मतदारांशी थेट संवाद, घराघरात भेटी आणि नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर भर देत सागर कोकणे सक्रियपणे प्रचारात सहभागी झाले आहेत. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्यामुळे प्रभागात त्यांना चांगला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
आज त्यांच्या प्रचारात एक आगळावेगळा आणि लक्षवेधी उपक्रम पाहायला मिळाला. सागर कोकणे यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क वासुदेवाच्या वेशात संपूर्ण प्रभागात प्रचार करत मतदारांचे लक्ष वेधून घेतले. “वासुदेव आला हो… घड्याळ पुढचं बटन दाबून सागर कोकणेला विजयी करा” अशा घोषणांसह हे कार्यकर्ते गल्लीबोळांतून फिरत प्रचार करत होते.
या अनोख्या पद्धतीमुळे प्रचारात वेगळाच रंग भरला असून नागरिकांमध्ये उत्सुकता आणि सकारात्मक चर्चा निर्माण झाली आहे. अनेक मतदारांनी थांबून हा प्रचार पाहिला, काहींनी मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले तर अनेकांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत सागर कोकणे यांना शुभेच्छा दिल्या.
प्रभागातील तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये या नावीन्यपूर्ण प्रचाराची विशेष चर्चा होत असून, पारंपरिक प्रचाराला लोककलेची जोड देत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण प्रभागात सध्या सागर कोकणे यांच्या प्रचाराची चांगलीच हवा तयार होत असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते मतदारांशी थेट नाते जोडत असल्याचे दिसून येत आहे.


