शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला असून, ऐश्वर्यम सोसायटी येथे आयोजित गेट-टुगेदर कार्यक्रमात तब्बल दोन हजार महिलांशी थेट संवाद साधण्यात आला.
खंडोबा माळ, आकुर्डी परिसरातील मोठ्या लोकसंख्येची ऐश्वर्यम वेंचर, गोल्ड व कम्फर्ट सोसायटी येथे काल (दि. २७) सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम पार पडला. या वेळी इच्छुक उमेदवार प्रसाद शंकर शेट्टी, कैलास भाऊ कुटे, मीनलताई विशाल यादव आणि ऐश्वर्याताई बाबर यांनी सर्व मतदारसंघांमध्ये व्यापक संपर्क साधत नागरिकांशी संवाद साधला.

या कार्यक्रमास विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे प्रमुख उपस्थित होते. महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभलेला हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी परिसरातील समस्या, अपेक्षा व विकासाबाबत आपली मते मांडली.
यावेळी माजी नगरसेवक प्रकाश शेठ बाबर, माजी नगरसेविका शारदा बाबर, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते अजय शेठ लड्डा, माजी नगरसेवक राजू दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा थेट जनसंपर्क, मोठ्या सभा आणि महिलांचा वाढता सहभाग पाहता प्रभाग क्रमांक १४ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसून येत आहे.


