spot_img
spot_img
spot_img

महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; विरोधकांचेही गणित जवळपास जुळले

उमेदवार यादी रखडल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांची महायुती अंतिम टप्प्यात पोहोचली असून, जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांच्या आघाड्यांचेही गणित जवळपास जुळले असले तरी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ येऊनही उमेदवार यादी जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे.

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय (आठवले) यांच्यात जागावाटपावर एकमत झाले असून, भाजप सुमारे ११२ जागांवर, शिवसेना (शिंदे गट) १३ जागांवर, तर आरपीआय (आठवले) ३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला भाजपाने सर्व १२८ जागांवर उमेदवार निश्चित केल्याची चर्चा होती; मात्र युतीला अंतिम स्वरूप देताना मित्रपक्षांसाठी काही जागा सोडाव्या लागल्याचे स्पष्ट झाले आहे. नेमक्या कोणत्या जागा सोडण्यात आल्या, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजपाची पहिली उमेदवार यादी रविवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असून, आमदार शंकर जगताप यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट यांच्यातील आघाडीबाबतच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. जागावाटपाचे सूत्र जवळपास ठरले असले तरी काही प्रभागांवर शरद पवार गट ठाम भूमिका घेत असल्याने थोडासा पेच निर्माण झाला आहे. मात्र हा तिढा लवकरच सुटेल, असा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, अजित पवार गटाने काही प्रभागांत चार उमेदवारांचे पॅनेल जाहीर करून प्रचारालाही सुरुवात केली असून, निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली आहे.

विरोधी आघाडीबाबत बोलायचे झाल्यास, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि काँग्रेस यांची आघाडी जवळपास निश्चित झाल्याचे समजते. काँग्रेसने अजित पवार गटासोबत न जाण्याची भूमिका स्पष्ट करत समविचारी पक्षांसोबतच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असतानाही प्रमुख पक्षांकडून अद्याप अधिकृत यादी जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. युती आणि आघाड्यांचे गणित जरी जवळपास निश्चित झाले असले, तरी खरे चित्र उमेदवार याद्या जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याने पुढील दोन दिवसांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!