गोरखे, चांदगुडे, हिंगे, कदम यांच्या उमेदवारीसाठी हजारोंची भव्य पदयात्रा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपाच्या चारही उमेदवारांनी प्रचाराची जोरदार आघाडी घेतली असून, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने हजारो मतदारांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
या पदयात्रेत प्रभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संत ज्ञानेश्वर नगर (म्हाडा), मोरवाडी, लालटोपी नगर, अमृतेश्वर कॉलनी, इंदिरानगर, सरस्वती विश्व विद्यालय परिसर, आंबेडकर नगर, एच.डी.एफ.सी. कॉलनी, दत्तनगर, विद्यानगर, शाहूनगर, वृंदावन सोसायटी आणि संभाजीनगर या परिसरांतून ही प्रचार रॅली काढण्यात आली.

शनिवार, दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विद्यानगर येथील हनुमान मंदिरापासून पदयात्रेला प्रारंभ झाला. रामेश्वर व दत्त मंदिर, संभाजीनगर येथे पदयात्रेचा समारोप झाला.
या प्रसंगी भाजपाचे आमदार अमित गोरखे, तसेच माजी महापौर मंगलाताई कदम, माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे, जिल्हा उपाध्यक्ष अजित भालेराव, मंडल अध्यक्ष धरम वाघमारे, राजेंद्र ढवळे, सौ सोनाली ताई हिंगे, श्री गौरव कदम, इत्यादी मान्यवरांसह असंख्य कार्यकर्ते, नागरिक बंधू आणि भगिनी उपस्थित होते. तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १० मधून भाजपाचे उमेदवार श्रीमती अनुराधा गणपत गोरखे, सुप्रिया महेश चांदगुडे, कुशाग्र मंगला अशोक कदम आणि तुषार रघुनाथ हिंगे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला.
यावेळी उमेदवारांनी भूमिका मांडताना सांगितले की, “प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. प्रत्येक नागरिकापर्यंत विकासकामे पोहोचवणे, सुविधा उपलब्ध करून देणे आणि जीवनमान उंचावणे ही आमची प्रमुख जबाबदारी आहे. “प्रभागाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आरोग्य व शिक्षण या दोन मूलभूत घटकांना केंद्रस्थानी ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाईल. प्रत्येक नागरिकाला सुलभ, परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या, माता-बाल आरोग्य योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर, दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम आणि आत्मनिर्भर पिढी घडवण्यासाठी शाळांच्या पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आणि कौशल्यविकास उपक्रम प्रभावीपणे राबविले जातील. आरोग्यपूर्ण शरीर आणि सशक्त विचार असलेला समाज घडवणे हेच आमचे विकासात्मक ध्येय असून, या माध्यमातून प्रभागाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आमचा संकल्प आहे.” सर्व नागरिकांनी एकत्र येऊन प्रभागाच्या प्रगतीसाठी साथ द्यावी.” असे आवाहन चारही उमेदवारांनी यावेळी केले.


