शबनम न्यूज | प्रतिनिधी
दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक 26 डिसेंबर रोजी चिखली घरकुल, शिवतीर्थ चौक येथे आयोजित उद्योग व रोजगार बैठकीत “दुर्गा ब्रिगेड उद्योग गट” स्थापन करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्ष कु. दुर्गा भोर यांनी महिलांशी थेट संवाद साधताना सांगितले की, आधुनिकरणाच्या काळात महिलांनी फक्त शिलाई मशीनपुरते मर्यादित न राहता सीएनसीसारखी अत्याधुनिक यंत्रेही आत्मसात करावीत आणि स्वतःचे उद्योग उभारावेत. शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी दुर्गा ब्रिगेड सक्षम असून महिलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उद्योगासाठी आवश्यक सहकार्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक प्रभागात महिलांकडून चालवले जाणारे छोटे-मोठे लघुउद्योग एकत्र आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महिलांना उद्योग नोंदणी, बाजारपेठ उपलब्धता, आर्थिक सल्ला व रोजगारनिर्मितीच्या संधी मिळाव्यात, यावर भर देण्यात आला.
बैठकीत महिलांवर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यात आले. कॉन्ट्रॅक्टरमार्फत काम करणाऱ्या महिलांना समान वेतन कायद्यानुसार पगार दिला जात नसल्याचे वास्तव समोर आले. हा अन्याय खाजगी क्षेत्रासह महानगरपालिका व इतर शासकीय आस्थापनांमध्येही सुरू असून वर्षानुवर्षे महिलांचे आर्थिक शोषण होत आहे, अशी तीव्र भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
तसेच अनेक ठिकाणी महिलांसाठी फक्त प्रशिक्षण दिले जाते; मात्र प्रत्यक्ष उद्योग सुरू करण्यासाठी विक्री केंद्र, बाजारपेठ व उद्योगासाठी जागा उपलब्ध होत नाही, ही गंभीर समस्या मांडण्यात आली.
यावर उपाय म्हणून दुर्गा ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेकडून महिलांसाठी विशेष विक्री केंद्र विकसित करण्यासाठी ठोस कृती व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे बैठकीत जाहीर करण्यात आले. तसेच महिला लघुउद्योगांसाठी उद्योग उभारणीसाठी स्वतंत्र जागा निर्माण करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.
या बैठकीस मार्गदर्शक म्हणून उपस्थित अभय भोर (अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडी) यांनी महिलांना उद्देशून आवाहन केले की,
“महिला भगिनी जर संघटित झाल्या, तर महिलांचा समूह उद्योग उभा करण्यासाठी दुर्गा ब्रिगेडतर्फे पूर्ण सहकार्य दिले जाईल. पुढील काळात वर्षभर महिलांच्या हाताला काम मिळावे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सौ. रईसा पठाण यांनी मान्यवरांचे स्वागत करून महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती दिली.
सौ. रमा बनसोडे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
तसेच उद्योजिका जयश्री साळुंखे यांनी शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर करून स्वतःचा उद्योग कसा उभा केला, याबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. लघुउद्योजका स्वाती दुबळे माही शेख आणि
या कार्यक्रमास महिलांचा मोठा सहभाग होता. दुर्गा ब्रिगेडमार्फत प्रभागनिहाय उद्योग गट उभारणीस लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


