मतदार स्वतः उतरले मैदानात; लोकसहभागातून उभा राहत आहे प्रभावी प्रचार
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीला दिवसेंदिवस वेग येत असताना, प्रभाग क्रमांक १८ मधून ज्योतीताई निंबाळकर यांच्या प्रचाराला आता वेगळीच आणि लक्षवेधी दिशा मिळताना दिसत आहे. या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे आता केवळ पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे, तर सामान्य मतदारही मोठ्या उत्साहाने पुढे येत प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहेत.
“आता लोकांनी ठरवलं आहे, प्रभाग क्रमांक १८ मधून ज्योतीताई निंबाळकर यांनाच लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिका सभागृहात पाठवायचं,” अशी ठाम भावना नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ही भावना केवळ बोलण्यात न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसून येत असल्याने प्रचाराला वेगळेच बळ मिळाले आहे.

याच पार्श्वभूमीवर, अनेक मतदारांनी स्वतःहून प्रचाराची धुरा हातात घेतली असून, घराघरांतून, गल्लीबोळांतून, परिसरात फिरून ते ज्योतीताई निंबाळकर यांच्या कार्याचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा संदेश पोहोचवत आहेत. प्रभागातील भावना नगर रचना कॉलनी परिसरात मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकांचा जाहीर पाठिंबा विशेष लक्ष वेधून घेत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीताई निंबाळकर या नेहमीच जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या, समस्यांकडे गांभीर्याने पाहणाऱ्या आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळेच त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये आपुलकी आणि विश्वास निर्माण झाला असून तो आता प्रचाराच्या रूपाने उघडपणे समोर येताना दिसतो आहे.

मतदार स्वतः पुढाकार घेऊन प्रचार करत असल्यामुळे ज्योतीताई निंबाळकर यांचा जनाधार दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हा लोकसहभागातून उभा राहिलेला प्रचार केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, लोकशाहीतील सक्रिय सहभागाचे उदाहरण ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
एकूणच, प्रभाग क्रमांक १८ मध्ये निवडणुकीची हवा आता स्पष्टपणे बदलताना दिसत असून, जनतेच्या पाठबळावर उभा राहिलेला ज्योतीताई निंबाळकर यांचा प्रचार आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल, अशी चर्चा सर्वत्र होत आहे.


