थेरगावमध्ये उत्साहाचे वातावरण; खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची उपस्थिती, कार्यकर्ते व नागरिकांचा मोठा प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्याला सुरुवात झाली असून शहरातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विश्वजीत बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज औपचारिकरीत्या दाखल केला.
थेरगाव येथील प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी नगरसेवक निलेश बारणे, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच थेरगाव परिसरातील असंख्य नागरिक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी बोलताना विश्वजीत बारणे यांनी सांगितले की, “थेरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. थेरगावकरांनी आजपर्यंत दिलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. जनतेच्या विश्वासाच्या जोरावर प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे.”
तसेच, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “विश्वजीत बारणे हे जनतेच्या विश्वासावर, संघटनेच्या ताकदीवर आणि विकासाच्या स्पष्ट भूमिकेवर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आतापर्यंत जनतेशी थेट संपर्क ठेवून काम केले असून त्यांचा जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे. मतदार निश्चितच त्यांच्यावर विश्वास टाकतील आणि त्यांना विजयी करतील,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
थेरगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारी अर्ज दाखल करताना सहभाग नोंदवत आपला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. नागरिकांच्या विश्वासाच्या साक्षीने आणि शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीच्या बळावर विश्वजीत बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणे हा प्रभाग क्रमांक २४ मधील निवडणूक प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.



