शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ‘हायहोल्टेज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधून भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी अधिकृतपणे निवडणूक रणांगणात उडी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचार मोहिमेचा भव्य शुभारंभ होणार असून, या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक २८ मध्ये फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लॅनेट मिलेनियम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, रोझ लक, गोविंद गार्डन आदी प्रमुख निवासी भागांचा समावेश आहे. या संपूर्ण परिसरात नगरसेवक म्हणून आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळे शत्रुघ्न काटे यांच्याबद्दल नागरिकांमध्ये मोठा विश्वास आणि उत्साह पाहायला मिळत आहे.
भाजपाच्या वतीने प्रचार मोहिमेचा शुभारंभ शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, मुंजोबा मंदिर चौक, पिंपळे सौदागर येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड शहराला ‘मेट्रो सिटी’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प प्रभाग क्रमांक २८ पासून प्रत्यक्षात उतरवायचा आहे. नागरिकांच्या विश्वासावर आणि सहभागावर विकासाची नवी दिशा ठरवू.” त्यांनी सर्व नागरिकांना विकासाच्या या प्रवासात साथ देण्याचे आवाहन केले.
केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या भक्कम पाठबळासह आणि शत्रुघ्न काटे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक २८ विकासाच्या दिशेने निर्णायक वाटचाल करेल, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.


