शबनम न्यूज | प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सागर कोकणे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येत असून प्रभागात प्रचाराचे चित्र अधिकच सक्रिय झाले आहे. आज सागर कोकणे यांच्या वतीने प्रचार पत्रकांचे व्यापक प्रमाणात वाटप करण्यात आले. या माध्यमातून त्यांच्या विकासदृष्टीची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली.
आजच्या प्रचार दौऱ्यात गाठीभेटींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. त्रिशक्ती कॉलनी, परिस कॉलनी, लक्ष्मी भाऊसाहेब तापकीर शाळेजवळील परिसर तसेच रोहित पालम सोसायटी या भागांमध्ये प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठ्यातील अनियमितता, ड्रेनेज व सांडपाणी व्यवस्थेची समस्या, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, स्ट्रीट लाईट्स बंद असणे, कचरा संकलनातील हलगर्जीपणा, आरोग्य केंद्रांची कमतरता तसेच वाहतूक कोंडी यासारख्या अनेक मूलभूत प्रश्न मांडले. महिलांनी सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला, तर युवकांनी रोजगार व क्रीडासुविधांची मागणी केली.
या सर्व प्रश्नांवर सागर कोकणे यांनी सकारात्मक भूमिका घेत “जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नागरिकांच्या समस्या हाच माझा अजेंडा असून प्रभागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास हेच माझे ध्येय आहे,” असे ठामपणे सांगितले. स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यासोबतच अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नियमित पाणीपुरवठा, आधुनिक कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा सक्षम करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, महिलांसाठी सुरक्षितता उपाययोजना, युवकांसाठी क्रीडांगण व रोजगाराभिमुख उपक्रम राबवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. प्रचारादरम्यान महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी नागरिकांनी सागर कोकणे यांना पाठिंबा जाहीर केला. स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचारात सक्रिय सहभाग घेत होते.
आगामी काळात प्रचार अधिक तीव्र करत प्रत्येक वस्ती, प्रत्येक सोसायटी व प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार सागर कोकणे यांनी व्यक्त केला आहे. जनतेच्या पाठबळावर विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


